केवळ 'या' शापामुळे रावण सीतेला स्पर्श करू शकला नाही
रावण महान विद्वान, पंडित, शूर, वीर, सर्व कलांमध्ये निपुण होता, परंतु त्याने या सर्व गुणांचा गैरवापर केल्यामुळे त्याचा उदो उदो करणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. त्याने सीतेचे अपहरण करूनही तिला वासनेने स्पर्श केला नाही, असा चुकीचा समज करून घेतला जातो. परंतु त्यामागचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचे कारण उत्तरकांड मध्ये सापडते.
वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडमध्ये २६ व्या अध्यायात ३९ व्या श्लोकात रावणाला मिळालेल्या शापाचे वर्णन आढळते. त्यात दिलेल्या पौराणिक कथेनुसार, रावणाने भगवान शिवशंकराची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतले. त्यांच्याकडून वर प्राप्त झाल्यावर रावण अधिकच शक्तिशाली बनला. तो त्रैलोक्यावर राज्य करायला निघाला. स्वर्ग लोक काबीज करायला निघालेला असताना तो आपला भाऊ कुबेर याच्या राज्यावर स्वारी करू पाहत होता. वाटेत त्याला रंभा नावाची अप्सरा दिसली. रंभा ही केवळ अप्सरा नव्हती तर कुबेरांची होणारी सून आणि कुबेर पुत्र नलकुबेर याची होणारी पत्नी होती.
रंभेला पाहताच मोहित झालेला रावण तिला वश करण्याचे प्रयत्न करू लागला. रंभेने त्याला हटकले. त्याने स्वतःचा परिचय दिल्यावर रंभा म्हणाली, तुम्ही तर माझे होणारे चुलत सासरे आणि मी तुमची भावी सून आहे. तसे असताना तुम्ही माझ्याशी असा व्यवहार करणे योग्य नाही. म्हणून तुम्ही माझा मार्ग अडवू नका. परंतु रावण तिच्यावर आपली शक्ती आजमावू लागला. रंभेने तिथून पळ काढला आणि तिने नलकुबेराला येऊन सगळी हकीकत सांगितली. त्यावर रागाच्या भरात नलकुबेराने आपल्या सख्ख्या काकाला म्हणजेच रावणाला शाप दिला, 'तू कोणत्याही परस्त्रीला मनाविरुद्ध स्पर्श केलास तर तुझे शीर धडापासून वेगळे होईल. तू दशानन राहणार नाहीस. तुझा लौकिक पुसला जाईल.'
हे सर्व जेव्हा घडल तेव्हा अयोध्या राजा दशरथाचा जन्मही झाला नव्हता. काळाचे चक्र चालूच राहिले आणि मग भगवान श्रीरामाचा जन्म रघुकुलात झाला. श्रीराम मोठे झाल्यावर राजा जनकाची मुलगी सीतेशी त्याचे लग्न झाले.
सितेचा विवाह स्वयंवर झाला होता. रावणची देखील तिथे उपस्थित होती. रावण हा देखील सीतेशी लग्न करण्यास तयार होता. पण त्याचा हेतू पूर्ण होऊ शकला नाही.
सीता श्रीरामाची पत्नी झाली. ती काही काळ अयोध्येत राहिली. पण विधी नुसार सीतेला श्रीरामाबरोबर वनवासाला जावं लागलं. जिथे एक दिवस रावण साधू म्हणून आला आणि त्याने सीताजीचे अपहरण केले आणि तिला लंकेत नेले.
पण नलकुबेर च्या शापामुळे रावण पतिव्रता सीतेला तिच्या मनाविरुद्ध स्पर्श करू शकला नाही. म्हणूनच तो तिची मनधरणी करत होता. परंतु सीता त्याच्या प्रलोभनांना भुलली नाही. तिचे रामावर आणि रामाचे सीतेवर निस्सीम प्रेम होते. याच गोष्टीची रावणाला मनस्वी चीड होती. म्हणून त्याने रामाला संपवण्याचा निश्चय केला होता. परंतु झाले वेगळेच! रावणाचा हेतू शुद्ध नसल्यामुळे त्याचा पराजय आणि रामाचा विजय झाला.
अन याच शापामुळे रावण सीतेला स्पर्श करू शकला नाही.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा